
कणकवली : तालुक्यातील तळेरे बसस्थानकातून दोन महिला प्रवाशांचा पर्स चोरीला गेल्या आहेत. या घटना सोमवारी दुपारी सव्वा बारा ते सायंकाळी साडे चार दरम्यान घडल्या. या चोरी प्रकरणी बेळगाव येथील एका महिलेला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बायजाबाई सुभाष देढे (वय ४०, रा.कागवाड,ता.बेळगाव) असे त्या संशयित महिलेचे नाव आहे. या दोन घटनांमध्ये एकूण ४ लाख ४७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
पहिली घटना दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली. यात मुंबईत राहणाऱ्या प्राची नारायण खांबल ह्या आपल्या कुटुंबासह अरूळे (ता.वैभववाडी) येथे आल्या होत्या. दुपारी साडे बाराच्या सुमारास त्या कणकवलीत येण्यासाठी तळेरे-कणकवली बसमध्ये चढल्या. बस सुरू झाल्यानंतर त्यांनी तिकीट काढण्यासाठी त्यांनी आपली बॅग उघडली. त्यावेळी त्या बॅगमध्ये छोटी पर्स नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या नांदगाव येथे उतरून पुन्हा तळेरे बसस्थानकात आल्या. तेथे बॅगमधून लंपास झालेल्या पर्सची शोधाशोध केली असता ती त्यांना आढळून आली नाही. या पर्समध्ये २ लाख ७० हजार रूपये किंमतीचे एक मंगळसूत्र, ९० हजार रूपयांचा सोन्याचा हार, ३५ हजार रूपयांचे सोन्याचे कुडे, ४० हजार रूपयांचा सोन्याची चैन आणि ७ हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ असा एकूण ४ लाख ४२ हजार रूपयांचा ऐवस होता. या चोरी प्रकरणी प्राची खांबल यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली.
पर्स लंपास होण्याची दुसरी घटना तळेरे बसस्थानकात सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. मणचे (ता.देवगड) येथे राहणाऱ्या तिलोत्तमा मणचेकर ह्या तळेरे येथून मणचे गावाकडे जाण्यासाठी काल निघाल्या होत्या. सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास त्या तळेरे बसस्थानकात आलेल्या वैभववाडी-विजयदुर्ग या एस.टी. बसमध्ये चढल्या. सीटवर बसल्यानंतर तिकीटासाठी पैसे काढण्यासाठी त्यांनी अापली सॅक उघडली. त्यावेळी सॅकमध्ये त्यांना त्यांची पर्स आढळून आली नाही. त्यावेळी तिलोत्तमा यांनी इतर प्रवाशांकडे आपल्या पर्सबाबत चौकशी केली. त्यावेळी एका महिला प्रवाशाने तुम्ही बसमध्ये चढत असताना तुमच्या पाठीमागे मेहंदी रंगाची आणि त्यावर पांढरी फुले असलेली साडी घातलेली एक महिला होती. तिने तुमच्या पाठीवर असलेली सॅक उघडण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले. त्यानंतर तिलोत्तमा आणि तिची नणंद सुविधा पवार यांनी तातडीने तळेरे बसस्थानकात त्या महिलेचा शोध सुरू केला. त्यावेळी तळेरे बसस्थानकात ही महिला आढळून आली. तिला थांबवून, तिच्याकडील सामानाची तपासणी केली असता, त्या सामानामध्ये चोरीस गेलेली पर्स अाढळून आली. तसे ही पर्स आपणच चाेरी केल्याची कबुली त्या संशयित महिलेने तिलोत्तमा यांना दिली.
या दरम्यान तेथील एका प्रवाशाने ११२ क्रमांकावर संपर्क साधून तळेरे बसस्थानकात पर्स लंपास करणाऱ्या त्या महिलेबाबत पोलिसांना कळविले होते. त्यानंतर तळेरे बसस्थानकात आलेल्या महिला पोलिसांनी पर्स लांबविणाऱ्या त्या महिलेला ताब्यात घेतले. त्यावेळी त्या महिलेसोबत अन्य तीन महिलाही असल्याचे समजताच त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
दरम्यान तिलोत्तमा मणचेकर यांची पर्स संशयित महिलेकडे आढळून आली असली तरी त्या पर्समधील ५२०० रूपयांची रोकड आणि जिल्हा बँकेचे पासबुक चोरीस गेलेआ त्याबाबतची फिर्याद तिलोत्तमा मणचेकर यांनी कणकवली पोलिसांत दिली. या घटनांचा अधिक तपास हवालदार स्मिता पवार करत आहेत.













