LIVE UPDATES

जमिनीच्या वादातून दोन कुटुंब भिडली

परस्पर विरोधी तक्रारी
Edited by: लवू परब
Published on: February 17, 2026 19:53 PM
views 257  views

दोडामार्ग : पणतुर्ली, घोडगाचीवाडी येथे जमीन वादाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये मारामारी झाल्याच्या परस्पर विरोधी तक्रारी येथील पोलिस ठाण्यात देण्यात आल्या. त्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण पाच व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११  वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी कुमार पंढरीनाथ मळीक (३५, रा. पणतुर्ली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जमीन जागेच्या कारणावरून संशयित उल्हास दत्ताराम घोगळे (६५, रा. पणतुर्ली) यांनी त्यांच्या राहत्या घराजवळ येऊन जमिनीच्या कारणावरून फिर्यादींच्या अंगावर धावून गेले. तसेच शिवीगाळ करून तुझा निकाल लागेल अशी धमकी दिली. दगड व लोखंडी पारई फेकून दुखापत केली. याचवेळी फिर्यादीचे काका सुभाष दुराजी मळीक यांच्या घरावर दगडफेक करून पत्र्याचे नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी त्याचदिवशी दुपारी २:२७ वाजता फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(१), ३५२, ३५१(२), ३२४(२), १३१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते ९:२० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी उर्मिला उल्हास घोगळे (६०, रा. पणतुर्ली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित उषा पंढरीनाथ मळीक (५५), स्नेहल संदेश मळीक (३०), माया रुपेश मळीक (४५) व पूजा समीर मळीक (३०, सर्व मूळ रा. मुंबई, सध्या रा. पणतुर्ली) यांनी फिर्यादी यांच्या राहत्या घरातील किचनमध्ये जाऊन फिर्यादी यांना शिवीगाळ केली व हाताच्या थापटाने मारहाण केली.  संशयित उषा मळीक यांनी फिर्यादी यांच्या डोक्यावर बांबूचा दांडा मारून दुखापत केली. तर उर्वरित संशयितांनी फिर्यादी यांच्या हाताला पकडून खाली पाडले व लाथा बुक्क्यांनी मारून मुका मार दिला. शिवाय फिर्यादी यांच्या नवऱ्याला सुद्धा असेच मारणार अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी सोमवारी सायंकाळी ४:५३ वाजता फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३३३,  ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.