
सावंतवाडी : आंबोली महादेव गड पॉईंट येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या बेळगाव निपाणी येथील पर्यटकांपैकी एक जण ४०० फुट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. डॉ. आयुब सय्यद ( वय ४५, रा. जत्राट, निपाणी, बेळगांव ) असे संबंधिताचे नाव आहे. लघुशंकेला गेला असताना हा प्रकार घडल्याचे त्याच्यासोबत असलेल्या युवकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस कर्मचारी संतोष गलोलेंसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोली येथील सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम आंबोली, सांगेलीला पाचरण केले. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, खोलदरी दाट धुके व कोसळणारा पाऊस आणि अंधार पडल्याने ही रेस्क्यू मोहीम अखेर थांबवण्यात आली. उद्या सकाळी ६ वा. पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
डॉ. आयुब सय्यद व त्यांचे इतर नऊ सहकारी मिळून दहा जण आंबोली महादेव गड येथे मंगळवारी सकाळी वर्षा पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास डॉ. आयुब सय्यद हे लघुशंकेसाठी महादेवगड पॉईंट येथील रेलिंग ओलांडून दरीच्या बाजूला गेले. मात्र, यावेळी तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले. याचवेळी बाजूला मक्याची कणसे विकणाऱ्या स्थानिक विक्रेत्याने त्यांना खाली कोसळताना पाहिले. त्याने याबाबतची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर इतर पर्यटक घटनास्थळी दाखल झाले.
शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमच्या साह्याने सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संततधार कोसळणारा पाऊस दाट धुके व अंधार पडल्याने अखेर ही मोहीम थांबविण्यात आली. बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती ही पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून दोनशे फूट पुढे जंगल भागात कोसळली असावी. त्याचा मोबाईल वरच पडला आहे. त्यामुळे मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेता येणार नाही. त्यामुळे बुधवारी प्रत्यक्ष शोध मोहीम सुरू झाल्यानंतरच नेमकी स्थिती लक्षात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.














