
सावंतवाडी : सह्याद्रीच्या पट्ट्यात गवारेडे आणि रानगाईच्या दहशतीमुळे स्थानिक शेतकरी पूर्णपणे हैराण झाले आहेत. शिरशिंगे-गोठवेवाडी येथील ७० वर्षीय शेतकरी सोमण विठ्ठल घावरे हे आपल्या भातशेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता, जंगलात दडून बसलेल्या गवारेड्याने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात घावरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून शिरशिंगे-गोठवेवाडी भागात गवारेडे आणि रानगाईंनी थेट शेतातच ठिय्या मांडला आहे. नुकतीच लावणी झालेली भातशेती या रानटी जनावरांनी तुडवून पूर्णपणे चिखलमय आणि उद्ध्वस्त केली आहे. आपल्या पिकाची झालेली नासाडी पाहण्यासाठी सोमण घावरे हे सोमवारी दुपारी शेतात गेले होते. हतबल होऊन शेताच्या बांधावर उभे असतानाच जंगलातून आलेल्या गवारेड्यांच्या कळपातील एका गवारेड्याने त्यांच्यावर थेट हल्ला चढवला.
या हल्ल्यात घावरे यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवन लाड यांनी या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला दिली. यंदा पाऊस चांगला झाल्याने भातशेती उत्तम बहरली होती, मात्र या रानटी जनावरांच्या धुमाकूळामुळे शेतकरी कमालीचे भयभीत झाले आहेत. शेतात जाणेही धोक्याचे ठरत असल्याने शेतकऱ्यांनी शेतावर जाणे बंद केले असल्याचे लाड यांनी सांगितले. या गंभीर समस्येकडे आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आले असून, वनविभागाने वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ आणि ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जीवन लाड व ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत वनरक्षक श्री. कलंगे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला घटनेची माहिती मिळाली असून जखमी घावरे यांची भेट घेऊन रितसर पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.










