
तळकट : विद्यार्थ्यांमध्ये वनौषधी वनस्पतींबाबत वैज्ञानिक दृष्टीकोन, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि पारंपरिक औषधी ज्ञानाची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने REAT पुणे, उमेद फौंडेशन (लॅब ऑन व्हील) आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळकट नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले वनौषधी वनस्पती प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळकटचे सरपंच सुरेंद्र सावंत भोसले होते. व्यासपीठावर उपसरपंच रमाकांत गवस, मुख्याध्यापक जनार्दन पाटील, पोलीस पाटील रामदास देसाई, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी डांगी तसेच उपाध्यक्ष नामदेव मळीक उपस्थित होते.
सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात रामायणातील संदर्भ आणि 'आजीबाईचा बटवा' या पारंपरिक ज्ञानाचा उल्लेख करत भारतीय संस्कृतीतील वनौषधींचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. निसर्गाशी नाते जपत औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वनौषधी वनस्पतींची आकर्षक मांडणी करून त्यांचे औषधी गुणधर्म, उपयोग, वैशिष्ट्ये आणि उपलब्धतेची ठिकाणे याविषयी माहिती प्रभावीपणे सादर केली. स्पर्धेत एकूण सात गटांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रथम तीन गटांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
उपस्थित पालक, ग्रामस्थ व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि उपक्रमाच्या नियोजनाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल REAT पुणे व उमेद फौंडेशन (लॅब ऑन व्हील)चे विज्ञान शिक्षक शिवप्रसाद नाटेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. या उपक्रमासाठी समन्वयक जे. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जनार्दन पाटील, शिक्षक गोरख जगधने, कमलाकर राऊत तसेच REAT पुणेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवप्रसाद नाटेकर यांनी केले. सूत्रसंचालन गोरख जगधने यांनी केले, तर आभार प्रदर्शन जनार्दन पाटील यांनी केले.










