LIVE UPDATES

जमिनीचा वाद व अंधश्रद्धेच्या संशयातून मानसिक छळ

सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद : पीडित व्यक्तीच्या पत्नीने दिली तक्रार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 04, 2026 17:13 PM
views 94  views

राजापूर : तालुक्यातील ताम्हाणे गावात जमिनीचा वाद आणि जादूटोण्याच्या संशयातून एका व्यक्तीचा दीर्घकाळ मानसिक छळ झाल्याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये संशयित नामदेव ताम्हणकर यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेबाबत पीडित व्यक्तीवर संशय घेत नामदेव ताम्हणकर व अनिता नामदेव ताम्हणकर हे मागील दहा वर्षांपासून त्यांना वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच मनोहर सोमा ताम्हणकर, मनिषा मनोहर ताम्हणकर, विशाल मनोहर ताम्हणकर आणि सागर मनोहर ताम्हणकर यांनी जमिनीच्या वादातून पीडित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने मानसिक छळ व त्रास दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी संशयित नामदेव गोविंद ताम्हणकर, अनिता नामदेव ताम्हणकर, मनोहर सोमा ताम्हणकर, मनिषा मनोहर ताम्हणकर, विशाल मनोहर ताम्हणकर आणि सागर मनोहर ताम्हणकर (सर्व रा. ताम्हाणे, ता. राजापूर) यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, राजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.