
कुडाळ : रानबांबुळी मढ जंगल परिसरातील बेकायदेशीर शिकारीच्या प्रकरणात तपासादरम्यान मोठी भर पडली असून, आणखी तीन संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. या कारवाईमुळे अवैध शिकारीच्या टोळीचा मोठा कट उघडकीस येत आहे.
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 3, 25 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 एप्रिल रोजी रात्री 10.55 वाजण्याच्या सुमारास रानबांबुळी बौद्धवाडी मढ जंगल परिसरात ही घटना घडली असून, 29 एप्रिल रोजी पहाटे 3.20 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी सुरुवातीला उमेध मोहन कदम (वय ४०, रा. रानबांबुळी, ता. कुडाळ) या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, या शिकारीच्या कारस्थानात सहभागी असलेल्या इतर दोन साथीदारांची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी रामचंद्र उर्फ गणेश पुनाजी लाड (वय २७, रा. रानबांबुळी) आणि सागर कमलाकर मोर्ये (वय ३१, रा. ओवळीये परबवाडी) या दोघांनाही अटक केली आहे.
संशयितांची यादी वाढली
यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र पुढील तपासात आणखी तीन जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यानुसार आरोपी पुढीलप्रमाणे आहेत. सचिन वामन शेंमडकर (वय 44, रा. हेदुळ लोहारवाडी, ता. मालवण), प्रदीप अनंत तेरसे (वय 39, रा. निरखे चिंचेचीवाडी, ता. कुडाळ), स्वप्नील हनुमंत जेठे (वय 30, रा. कसाल कारलेवाडी, ता. कुडाळ) याचा समावेश आहे.
सखोल तपास सुरूच
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईनंतर आता सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. शिकारीसाठी वापरले जाणारे शस्त्र आणि काडतुसे याआधीच जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या कारवाईमुळे जंगल परिसरात अवैध शिकारी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.














