
दोडामार्ग : साटेली-भेडशी येथील बीएसएनएल एक्सचेंज कार्यालयात झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला आहे. या चोरीप्रकरणी पोलिसांनी संशयित शंकर तायाप्पा घोरपडे (३१ वर्षे, रा. लासुरणे, ता. इंदापूर, जि. पुणे याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बीएसएनएल कार्यालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत अंदाजे दहा हजार रुपयांच्या किमतीचे मदरबोर्ड्स व कार्ड्स चोरून नेले होते. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक श्री. हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. तपासादरम्यान सहा. पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, हवालदार रामचंद्र मळगावकर, वसंत देसाई, अंकुश नाईक, पोलीस नाईक रामचंद्र साटेलर, काॅंस्टेबल विजय जाधव, अभिजीत कांबळे यांना दोडामार्ग ते विजघर रोडवर एक इसम दुचाकीने बॅगमधून काहीतरी घेऊन चालल्याचे दिसला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव शंकर तायाप्पा घोरपडे सांगितले. तसेच त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीस गेलेले मदरबोर्ड्स व कार्ड्स आढळून आले. चौकशीत संशयिताने चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच यापूर्वीही याच कार्यालयात दि. २३ मार्च २०२६ रोजी सुमारे ३८ हजार ४०० रुपयांची चोरी त्याने बीएसएनएल कार्यालयातून चोरल्याचे उघड झाले. संशयितास अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.














