
कुडाळ : सन २०२१ मध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या 'जनआशीर्वाद यात्रे' दरम्यान घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्यासह १२ जणांची कुडाळ न्यायालयाने काल निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेले :
न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार १) राजन नाईक, २) संजय भोगटे, ३) मंदार शिरसाठ, ४) देवानंद काळप, ५) संतोष शिरसाट, ६) योगेश धुरी, ७) रुपेश पावस्कर, ८) अतुल बंगे, ९) शेखर गावडे, १०) धीरेंद्र चव्हाण, ११) सुशील चिंदरकर आणि १२) शेखर गवंडे या १२ जणांची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे.
२०२१ मध्ये नारायण राणे केंद्रीय मंत्री बनल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची जनआशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. ही यात्रा कुडाळ येथील शिवसेना (उबाठा) तालुका कार्यालयाजवळ पोहोचली असता, राणे समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देत काळे झेंडे दाखवले होते. यावरून कुडाळ पोलीस ठाण्यात राजन नाईक व इतर कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी कुडाळ न्यायालयात पार पडली. संशयित आरोपींच्या वतीने ॲड. सुधीर राऊळ, ॲड. किर्ती कदम आणि ॲड. प्रदनेश राऊळ यांनी युक्तिवाद केला. सादर केलेले पुरावे आणि बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने या सर्व १२ जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. या निकालाचे शिवसैनिकांनी स्वागत केले आहे.













