LIVE UPDATES

कोयत्याने वार केल्याचं प्रकरण ; निर्दोष मुक्तता

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 07, 2026 15:38 PM
views 41  views

सावंतवाडी : फिर्यादीवर कोयत्याने वार करून दुखापत व शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या गंभीर आरोपातून आरोपी सागर आबा साळुंखे याची सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीम. जे. एम. मेस्त्री यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयात फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबात आढळलेली विसंगती आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला. आरोपीच्यावतीने ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर, ॲड. गणेश चव्हाण, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर, ॲड. केतन जाधव आणि ॲड. वामन गवस यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

 या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, १० जुलै २०२२ रोजी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या गाडीची चार्जिंगला दिलेली बॅटरी आणण्यासाठी दुकानदारकडे गेले होते. बॅटरी घेऊन फिर्यादी आपल्या स्कूटरवर बसून घरी जाण्यास निघत असताना, आरोपी सागर साळुंखे याने पाठीमागून हातात कोयता घेऊन येत फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि डाव्या मांडीवर कोयत्याच्या पाठीमागील बाजूने मारले. यावेळी फिर्यादीने आरोपीच्या हातातील कोयता पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला दुखापत झाली होती. हा प्रकार पाहून संबंधित दुकानदाराने तात्काळ धावत येत आरोपीच्या हातातील कोयता काढून घेतला. या झटापटीनंतर फिर्यादी घरी निघत असताना आरोपीने "तू आता वाचलास, पुन्हा मला भेट, मी तुला संपवणार" अशी धमकी देत शिवीगाळ केली होती, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा फौजदारी खटला सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालला. या खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, न्यायालयाने साक्षीदारांचे जाबजबाब आणि फिर्यादीने दिलेली मूळ फिर्याद तपासून पाहिली असता, त्यांच्यामध्ये मोठी विसंगती व तफावत आढळून आली. त्यामुळे आरोपीविरुद्ध लावण्यात आलेले दुखापत व धमकीचे आरोप प्रथमदर्शनी सिद्ध होऊ शकले नाहीत.

बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात केलेला प्रभावी युक्तिवाद आणि पुराव्यांमधील त्रुटी ग्राह्य धरून न्यायाधीश श्रीम. जे. एम. मेस्त्री यांनी आरोपी सागर आबा साळुंखे याची सर्व आरोपातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली.