LIVE UPDATES

Mumbai Goa Highway Accident : तळेरे येथे भरधाव डंपरची पादचाऱ्याला धडक

६० वर्षीय रोहिदास देसाई यांचा मृत्यू : मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर अपघात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 06:50 PM
views 125  views
Fatal Dumper Accident on Mumbai Goa Highway Service Road at Tarele in Kankavli

कणकवली : मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरची सर्व्हिस रोडच्या बाजूने चालत असलेल्या रोहिदास हरिश्चंद्र देसाई (६०, रा. तळरे) यांना धडक बसली. या अपघातात रोहिदास यांचा मृत्यू झाला. हा अपघात तळेरे येथे महामार्गाअंतर्गत सर्व्हिस रोडवर शनिवारी सकाळी ११.१५ वा. सुमारास घडला.

डंपरचालक देवानंद गंगाराम साटम (३८, रा .नाद, ता. देवगड) हा आपल्या ताब्यातील डंपर घेऊन मुंबई ते गोव्याच्या दिशेने जात होता. तळेरे येथे उड्डाण पुलानजीकच्या सर्व्हिस रोडच्या बाजूने रोहिदास देसाई चालत जात होते. यावेळी भरधाव डंपरच्या डाव्या बाजूची रोहिदास यांना धडक बसली. धडकेत रोहिदास डंपर सोबत फरफटत गेले.

अपघाताचे वृत्त समजतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहिदास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताबाबत रोहिदास यांचे नातेवाईक नंदकुमार देसाई (४३, रा. तळेरे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार डंपरचालक देवानंद साटम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.