
कणकवली : तळेरे बसस्थानक येथे झालेल्या धाडसी चोर्यांप्रकरणी चार महिला व एक पुरुष अशा पाच जाणांच्या टोळक्याला कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने यापूर्वीच अटक केली आहे. दरम्यान संशयितांकडील तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी पोलीस व कणकवली पोलिसांनी या चोरीच्या घटनांमधील जवळपास ४५ ग्रॅम एवढ्या किंमतीचे दागिने देखील हस्तगत केले आहेत. हे दागिने संशयित महिलांपैकी एका महिलेच्या निपाणी येथील राहत्या घरामधून हस्तगत करण्यात आले आहेत.
तळेरे बसस्थानक येथे काही दिवसांपूर्वी सातत्याने महिलांच्या पर्समधील दागिने चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास कणकवली पोलीस व एलसीबीचे पथक समांतररित्या करत होते. अखेरीस दोन्ही पथकांनी मिळून रुपाली पिंटू चौगुले (३८), दिपाली खन्ना चौगुले (३५), प्रेम पिंटू चौगुले (१९, तिन्ही रा. निपाणी – बेळगांव), सपना समशेर चौगुले (३९, रा. सांगली), बायजाबाई सुभाष देडे (४२, रा.वडगाव,कोल्हापूर) यांना अटक केली होती. सध्या त्यांची रवानगी कोठडीत आहे. दरम्यान पोलीस कोठडी कालावधीत पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली. त्यामध्ये चोरीचे दागिने एका संशयित महिलेच्या घरामध्येच असल्याची बाब उघड झाली. त्यानुसार कणकवली पोलीस व एलसीबीचे पथक निपाणी येथे रवान झाले व सदरचे दागिने हस्तगत केले.
या कामगिरीत पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार श्रीमती गवस, श्रीमती कोलगे मॅडम, हवालदार श्री. घोन्सालवीस, श्री. तवटे, श्री. गोसावी,पोलीस अंमलदार अमर कांडर, महिला पोलिस शिपाई धनश्री परब (सायबर) तसेच कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे,पोलीस हवालदार पांडूरंग पांढरे,महिला पोलिस शिपाई श्रीमती चरापले व खरात आदी सहभागी झाले होते.













