LIVE UPDATES

कातवण किनाऱ्यावर संशयास्पद साहित्य

दोन ऑक्सिजन सिलेंडरसह अन्य साहित्य
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 18, 2026 19:45 PM
views 112  views

देवगड पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाची घटनास्थळी धाव

देवगड : देवगड तालुक्यातील कातवण समुद्रकिनारी शनिवारी दुपारच्या सुमारास दोन ऑक्सिजन सिलेंडर आणि काही संशयास्पद साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही बाब एका स्थानिक मच्छिमाराच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ देवगड पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन ऑक्सिजन सिलेंडर तसेच अन्य साहित्य ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात हे सिलेंडर ऑक्सिजनचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी पिण्याचे पाणी, प्रोटीन बिस्किटांची पाकिटे, स्मोक सिग्नल आणि हँड फ्लेअर असे साहित्यही आढळून आले. हे साहित्य समुद्रात वाहतूक करणाऱ्या एखाद्या जहाजावर किंवा नौकेवरून पाण्यात पडले असावे आणि प्रवाहामुळे किनाऱ्यावर येऊन लागले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आढळलेल्या साहित्याची फॉरेन्सिक तपासणीही करण्यात येणार आहे.

दरम्यान, किनारपट्टीवर कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देवगड पोलिसांनी केले आहे.