LIVE UPDATES

आत्महत्या की हत्या ?

पिता, पूत्राचा संशयास्पद मृतदेह
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 27, 2026 18:57 PM
views 274  views

गोवा : गोवा राज्यातील इंदिरानगर, करासवाडा-म्हापसा येथे एका भाड्याच्या खोलीत राहणार्‍या सोनुर्ली-सावंतवाडी येथील जाधव कुटुंबातील पिता व पूत्राचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. तर त्याची आई देखील गंभीर जखमी असून तिच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. विष प्राशन करून आत्महत्येचा प्रकार असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार दिसून येत आहे. या कुटुंबाने अचानक उचलेल्या टोकाच्या पाऊलाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न गोवा पोलिस करत आहेत.

मृतामध्ये अजय जाधव (वय ३८) आणि अर्थव जाधव (वय ७) यांचा समावेश आहेत. मयत अजय यांची पत्नी सुवर्णा जाधव (वय ३०) यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. गेल्या एक वर्षापासून हे जाधव कुटुंब इंदिरानगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. अजय जाधव हे पणजी येथील एका खासगी बँकेत नोकरीला होते, तर सुवर्णा गृहिणी असून मुलगा अथर्व हा शाळेत जात होता. शनिवारी २७ रोजी दुपारी १२ वा. च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत अजय जाधव यांनी शुक्रवारी रात्री गावी आपल्या घरी वडिलांना फोन केला. मुलगा आणि बायको झोपत नाहीत, असे सांगितले. वडिलांनी त्यांना देवाचा अंगारा लाव आणि झोपा असा सल्ला दिला होता. तसेच अजय याने भावाला फोन करून आपली तब्येत चांगली नसल्याचे सांगितले होते.

शनिवारी सकाळ पासून मुलगा व सून फोन उचलत नव्हते. संशय बळावल्याने अजयचे वडिल थेट सोनुर्लीहून प्रवासी बसने म्हापशात आले व इंदिरानगर येथे मुलाच्या खोलीवर आले. मात्र खोलीचा दरवाजा आतून बंद होता. घर मालकाच्या सहाय्याने हा दरवाजा उघडला असता खोलीमध्ये मुलगा, सून व नातू निपचित पडले होते. हे थरारक दृश्य पाहून सर्वजण हादरले. तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. परिचारिकेने सुवर्णा जाधव यांची नाडी तपासली तेव्हा ती जीवंत असल्याचे समजताच त्यांना तत्काळ म्हापसा जिल्हा इस्पितळात हलवण्यात आले. तिथून त्यांना पुढील उपचारार्थ गोमेकॉमध्ये पाठवण्यात आले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागाीत उपचार सुरू आहेत. तर अजय व त्यांचा मुलगा अथर्व या दोघांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस निरीक्षक नवीन देसाई, उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर व त्यांच्या सहाकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व  दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवले.

घटनास्थळी खोलीमध्ये रात्री बनवलेले जेवण तसेच होते. त्यामुळे या जाधव कुटूंबाने रात्री जेवणा अगोदर हा आत्महत्येचा धक्कादायक प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न आहे, की यामागे अजून काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत असून जखमी सुवर्णा जाधव ही शुद्धीवर आल्यानंतरच या घटनेचे नेमके कारण समोर येणार आहे.