
संशयितांच्या एका सहकार्यासही 'प्रसाद'
कणकवली : दोन अल्पवयीन मुलींची छेड काढल्याबाबत नागरिकांनी प्रसाद देऊन कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या त्या दोन्ही परप्रांतीय युवकांवर अखेर पोक्सोचा (बाल लैंगिक अत्याचार) गुन्हा दाखल झाला आहे. दोन मुलींपैकी एका मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित गुरी सुखविंदर सिंग गिल (२२) व हरप्रीत मलखित सिंह (२५ दोन्ही रा. मुळ पंजाब) या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान याच संशयितांच्या एका सहकार्याने एका फेसबुक पोस्टवर सदर संशयितांचे समर्थन करणारी व मुलींना दोष देणारी 'कमेंट' केल्याच्या रागातून नागरिकांनी शनिवारी संशयित काम करत असल्याचे सलून गाठून या सहकार्यासही 'प्रसाद' दिला. मात्र, या प्रकाराची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.
ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वा. सुमारास घडली होती. पिडीत मुली शिवणक्लासला जात असताना संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. तसेच दोघींच्या हाताला पकडून, मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांवर भा.न्या.स. कलम ७४, ७५, ७८, ३५ २, ३ ५ तसेच ८ व १२ (पोक्सो)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याच घटनेविषयी एका फेसबुक पोस्टवर वर संशयितांच्या सहकार्याने एक 'कमेंट' केली. सदर कमेंटमध्ये संशयितांचे समर्थन व पिडीत मुलींना दोष देण्यात आला होता. याबाबतची माहिती समजताच नागरिकांनी संशयित काम करत असलेले सलून गाठले. नागरिकांनी त्या सहकार्यास जाब विचारत काहीचा 'प्रसाद'ही दिला. अखेर त्या सहकार्याने माफी मागितली व या प्रकरणावर पडदा पडला.














