LIVE UPDATES

मुलीशी लग्न करायला दिला नकार, डोक्यात राग धरून आईचाच काढला काटा

पोलिसांनी घुमविली सूत्र ; संशयित आरोपीला घेतलं ताब्यात
Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2026 19:42 PM
views 764  views

सिंधुदुर्ग : साखळी येथील चिखणे-कुडणे भागात ५८ वर्षीय शैला घाडी या महिलेची निघृण हत्या झाली होती. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने सावंतवाडीतील एका फरार आरोपीला अटक केली. महाराष्ट्र व गोवा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवत ३४ वर्षीय संशयित सागर राऊळ (रा. शिरशिंगे-सावंतवाडी ) याला ताब्यात घेतले. संशयिताने पीडित महिलेच्या लहान मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, शैला घाडी यांनी या विवाह प्रस्तावाला ठाम विरोध केला. याच रागातून संशयिताने हे टोकाचे पाऊल उचलत त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


हत्या केल्यानंतर संशयिताने मृत महिलेच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि मोबाईल फोन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून सुमारे १.११ लाख रुपये किमतीचा चोरलेला ऐवज जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. डिचोली पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, फौजदार मनोहर तावरे, संतोष मदने, तसेच पोलीस अंमलदार शिवाजी पाटील, रविंद्र भालेराव, विजय गायकवाड, प्रविणराज पवार, धनंजय चौधरी, हनुमंत सुर्यवंशी, समीर यादव, अश्विन पाटील, रविंद्र कांबळे, संदिप शेरमाळे, विकास राजपुत, सनी सुर्यवंशी, सचिन चौधरी यांच पथकाने केली आहे.