LIVE UPDATES

चोरीची मोटारसायकल दोन तासांत हस्तगत

वर्ध्यातील आरोपीला अटक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 09, 2026 19:29 PM
views 82  views

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी

कणकवली : कणकवली शहरातून चोरीला गेलेली मोटारसायकल अवघ्या दोन तासांत शोधून काढत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वर्धा जिल्ह्यातील एका आरोपीला अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पाध्ये मेडिकलमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत असलेले महेश भगवान बाईत (रा. पारकर चाळ, विद्यानगर, कणकवली) यांनी ८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची होंडा ड्रीम युगा (एमएच ०७ एएल ३२४३) मोटारसायकल पाध्ये मेडिकलसमोरील मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेत उभी करून ते कामावर गेले होते. दुपारी २ वाजता जेवणासाठी घरी जाण्यासाठी आले असता मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात तसेच कणकवली शहरात शोध घेऊनही मोटारसायकल न मिळाल्याने त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा समांतर तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित सुनील जनार्दन दारोडे (वय ४०, रा. जामिनी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) याचा शोध घेतला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत नरडवे नाका येथील बसथांब्याजवळून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत आरोपीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा ड्रीम युगा मोटारसायकल जप्त करण्यात आली असून वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला कणकवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार प्रकाश कदम, जॅकसन घोन्साल्विस आणि डॉमिनिक डिसोझा यांच्या पथकाने केली.