LIVE UPDATES

शेअर ट्रेडिंग मार्केट घोटाळा ; सागर कारिवडेकर बंगल्यात ठाणे क्राईम ब्रँचचं विशेष पथक

मालमत्ता जप्त
Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 15:10 PM
views 345  views

सावंतवाडी : शेअर ट्रेडिंग मार्केटमधील कोट्यवधींच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित सागर कारिवडेकर याच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्यात दाखल होत  ठाणे क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाने पंचनामा करत मालमत्ता जप्त केली. कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात कारिवडेकर यांच्यावर करण्यात आला असून आज ठाण्यातील पोलीस पथक दाखल झाल्याने खळबळ उडाली.


यावेळी सावंतवाडी पोलिसही उपस्थित होते. दाराला कुलूप असल्याने तज्ञाला‌ बोलावून ते उघडण्यात आले. यावेळी संशयिताचे बंधू श्री. कारिवडेकरही उपस्थित होते. त्यांनी पोलिसांच्या तपास कार्यात आक्षेप नसल्याचे सांगितले. या प्रकरणात ठाण्यातील सचिन राणे, प्रिती राणे आणि सावंतवाडीचा सागर कारिवडेकर या तिघांनी मिळून हे मोठे रॅकेट चालवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. यात सावंतवाडीतील श्री. कारिवडेकर यांचा आलिशान बंगला पोलीस तपासाच्या केंद्रस्थानी आहे. सकाळी घटनास्थळी येत पोलिसांनी पंचनामा केला. अनेकांचे पैसे या शेअर ट्रेडिंग मार्केट प्रकरणात अडकल्याचे समोर येत आहे.