
- करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका
वैभववाडी : करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी पहाटे केलेल्या तपासणीदरम्यान एका आरामबसच्या सामान कक्षातून ३६ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी बसचा क्लिनर सचिन बाबासाहेब ईरकर (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करूळ तपासणी नाक्यावर पोलीस कर्मचारी संदीप राठोड आणि हरेष जायभाय हे सोमवारी सायंकाळपासून तपासणीसाठी तैनात होते. मंगळवारी पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून वैभववाडीच्या दिशेने येणारी आरामबस (क्र. जीए ०८ व्ही ८३७७) तपासणीसाठी थांबविण्यात आली.यावेळी बस चालक दत्तात्रय ईतापे, अमोल कोंडाळकर आणि क्लिनर सचिन ईरकर यांना सामान कक्ष उघडण्यास सांगण्यात आले. दोन कक्षांची तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र, तिसरा सामान कक्ष उघडत नसल्याचे क्लिनरने सांगितल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी संबंधित कक्ष उघडण्यास सांगितल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे तीन बॉक्स आढळून आले.
या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक फक्रुद्दीन आगा यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. पोलिसांनी दारूसह एकूण ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कारवाई पूर्ण केल्यानंतर आरामबस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.या प्रकरणी सचिन बाबासाहेब ईरकर याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.














