LIVE UPDATES

सिंधुदुर्गात २ कोटी ३७ लाखांच्या अंबरग्रीसची तस्करी उघड

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ४ जण जेरबंद
Edited by:
Published on: August 30, 2026 08:25 AM
views 72  views

कुडाळ : प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) विनापरवाना तस्करी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. कुडाळ पोलीस ठाणे हद्दीतील पणदूर ते कडावल मार्गावर सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली असून, आरोपींकडून २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये किमतीचे २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:२० वाजण्याच्या सुमारास कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत गस्त सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला अंबरग्रीसच्या तस्करीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पणदूर-कडावल डांबरी रस्त्यालगत, कुलस्वामीनी एंटरप्रायझेस बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स कार्यालयाजवळ सापळा रचण्यात आला.

यावेळी एका काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (MH 07 AN 5294) आणि एका राखाडी रंगाची मारुती सुझुकी इर्टीगा चारचाकी गाडीतून (MH 07 AS 3747) आलेल्या संशयितांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले प्रतिबंधीत अंबरग्रीस मिळून आले.

संकेत संतोष चव्हाण (वय २६, रा. रवळनाथनगर, ओरोस, मूळ रा. निरूखे, ता. कुडाळ)

महेश लक्ष्मण रेवणकर (वय ३५, सध्या रा. कुवारबांव, रत्नागिरी, मूळ रा. रेवंडी, ता. मालवण)

अमेय पुंडलिक देसाई (वय ३१, रा. ओरोस रवळनाथ नगर, ता. कुडाळ)

अमित अरुण अणावकर (वय ३९, रा. अणाव, ता. कुडाळ) यांना ताब्यात घेतल आहे.

याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, परिमंडल पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, एएसआय सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा, आशीष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांच्या पथकाने पार पाडली.