
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील आंबडस-खांदाट सीमेवर चिपळूण ते चोरवणे जाणारी बस आणि कासई ते चिपळूण येणारी बस यांच्यात भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन्ही बसमधील सुमारे २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस व एस.टी विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालय, कामथे येथे हलवण्यात आले आहे.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करून अपघाताचा पुढील तपास केला जाण्याची शक्यता आहे. या अपघातातील जखमींची नेमकी संख्या, त्यांची प्रकृती आणि अपघाताचे कारण याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.










