LIVE UPDATES

कोनशी येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत रक्षाबंधन उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 29, 2026 20:04 PM
views 28  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशी येथे विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, बंधुभाव, प्रेम, आपुलकी आणि परस्पर सन्मान या मूल्यांची जाणीव करून देण्यात आली.

कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना प्रेमाने राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या, तर विद्यार्थ्यांनीही बहिणींच्या सन्मानाचे व संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. काही विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून त्या बांधल्यामुळे कार्यक्रमाला विशेष आनंदाची आणि उत्साहाची किनार लाभली.

विद्यार्थिनींनी औक्षण करून रक्षाबंधनाची पारंपरिक पद्धतही अनुभवली. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून मानवी नात्यांविषयी विश्वास, काळजी, जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक आहे. हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने शाळेत हा उपक्रम घेण्यात आला. मुला-मुलींनी एकत्रितपणे सहभाग घेतल्याने लिंगसमभाव, परस्पर आदर, सहकार्य, बंधुभाव आणि सामाजिक एकोपा यांसारख्या मूल्यांना चालना मिळाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील मूल्यशिक्षण प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता आले. ‘करून शिकणे’ आणि ‘अनुभवातून शिकणे’ या दृष्टिकोनातून रक्षाबंधनाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि अर्थपूर्ण ठरला.कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सण-परंपरांविषयी अभिमान, नात्यांतील जिव्हाळा आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे शाळेतील वातावरण आनंदमय झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सण-उत्सवांना मूल्यशिक्षणाशी जोडण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला. हा कार्यक्रम, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.