न्या. राकेश बिले यांच्या सत्कार सोहळ्यासह न्यायमूर्ती ब्रह्मे यांचे व्याख्यान

१८ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 18:41 PM
views 48  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या सचिव तथा वरिष्ठ विधी सल्लागारपदी निवड झालेले सिंधुदुर्गचे सुपुत्र लाडशेट (राकेश) दत्ताराम बिले यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांच्या हस्ते बिले यांचा सत्कार होणार असून, यानिमित्त न्यायमूर्ती ब्रह्मे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे.

संघटनेतर्फे आयोजित हा कार्यक्रम रविवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागात सचिव तथा वरिष्ठ विधी सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल बिले यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रह्मे यांचे ‘दिवाणी प्रक्रिया संहितेतील लक्ष्मणरेषा आणि न्यायोचित हस्तक्षेप’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दिवाणी प्रक्रिया संहितेची व्याप्ती, न्यायालयीन हस्तक्षेपाच्या मर्यादा आणि न्यायदान प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबींवर या व्याख्यानातून मार्गदर्शन केले जाणार आहे.

या कार्यक्रमाला वकील आणि विधी क्षेत्रातील अभ्यासकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेने केले आहे. पत्रकार परिषदेला संघटनेच्या उपाध्यक्ष ॲड. नीलिमा गावडे, सचिव ॲड. यतीश खानोलकर, ॲड. अक्षय चिंदरकर, ॲड. शामराव सावंत, ॲड. कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.