मानधन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

परुळेबाजार उपसरपंच प्राजक्ता पाटकर यांचा आदर्शवत निर्णय
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 18:33 PM
views 80  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला असून, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्राजक्ता प्रसाद पाटकर यांनी एक आदर्शवत निर्णय घेतला आहे. आपल्या उपसरपंचपदाच्या संपूर्ण कार्यकाळात मिळणारे मानधन परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, त्यानुसार मिळालेले मानधन ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले आहे. 

दरम्यान, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या निर्णयाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यातील भातशेतीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कमी पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, आगामी काळात पाणीटंचाईची समस्याही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या मोहिमेला आर्थिक व श्रमदानाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

याच सामाजिक जाणिवेतून उपसरपंच प्राजक्ता पाटकर यांनी आपल्या मानधनाचा उपयोग वैयक्तिक लाभासाठी न करता गावातील संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. दिपक केसरकर, आ. नीलेश राणे तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

दुष्काळाच्या संकटात आपल्या गावातील नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याचा त्यांचा हा पुढाकार इतर लोकप्रतिनिधींसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे. संकटाच्या काळात लोकसहभागातून मदतीचे हात पुढे आले, तर दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळण्यास निश्चितच मदत होऊ शकते.