दुकानफोड्या करणारे चोरटे अखेर जेरबंद

पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील एलसीबीच्या पथकाची कामगिरी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 06, 2026 08:21 AM
views 747  views

कणकवली : कणकवली आणि सावंतवाडी अशा दोन ठिकाणी सलग दोन रात्री अनेक दुकाने फोडणाऱ्या जोडीला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने रायगड येथे रविवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. सावंतवाडी येथील दुकानफोड्या होऊन जमतेम 24 तास उलटत नाहीत तोच एलसीबीच्या पथकाने उत्कृष्ट तपास करत या जोडीला जेरबंद केले आहे. ही कामगिरी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. राहुल उर्फ दिवाण ओमप्रकाश तोमर (वय 36), राजपथ संतराम पाल ( वय 52) दोघे रा. भाईंदर पूर्व घोडदेव नाका फुटपाथ ( मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी चोरट्यांची नावे असून दोघांनाही आज सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.


या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार प्रकाश कदम, राजेंद्र गोसावी, किरण देसाई, आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे, जाक्सन घोन्साल्वीस आदी सहभागी झाले होते. एलसीबीच्या पथकाला रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव हवालदार युवराज पाटील, रोहा पोलीस ठाणे, रोहा येथील रेल्वे सुरक्षा बल  यांचेही बहुमोल सहकार्य लाभले.‌


कणकवली येथील दुकानफोड्या शनिवारी भल्या सकाळीच उघडकीस आल्या होत्या. कणकवली शहरातील मेडिकल जनरल, स्टोअर्स हॉटेल वगैरे मिळून दहा दुकाने चोरट्यांनी फोडली होती. तर सावंतवाडी येथील दुकानफोड्या रविवारी सकाळीच उघडकीस आल्या होत्या. तेथेही सहा दुकाने चोरट्याने फोडली होती. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दोन्ही ठिकाणचे चोरटे एकच असल्याची बाबही निष्पन्न झाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने रविवारी सायंकाळ नंतर रोह्याच्या दिशेने कूच केली. अखेरीस पथकाने चोरट्यांना जेरबंद केले. एलसीबीच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.