
वैभववाडी : परजिल्ह्यातील एका १७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि त्याचे व्हिडिओ बनवून बदनाम करण्याची धमकी दिल्याप्रकरणी नेर्ले येथील दोघे तर ताम्हाणे येथील एकावर वैभववाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना आज (ता.१६) अटक केली. हा प्रकार १ जुलै २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मयुर सुर्वे, ओंकार पंढरी सुर्वे, (दोघेही रा.नेर्ले, ता.वैभववाडी), पंकज पवार (रा. ताम्हाणे बौध्दवाडी, ता.राजापुर ) असं संशयित आरोपींची नावं आहेत.
जिल्ह्याबाहेरील अल्पवयीन तरुणीची तालुक्यातील नेर्ले येथील ओंकार सुर्वे या तरुणाशी ओळख झाली. या ओळखीनंतर ती तरुणी ओंकार व मयुर या संशयित आरोपींसोबत दुचाकीवरून तालुक्यातील एका पर्यटनस्थळावर आली होती. पर्यटनस्थळी उशिर झाल्याने तिला घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्या दोघांनी तिला आपल्या नेर्ले येथील घरी नेले. एका संशयिताने सुरूवातीला तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्याला विरोध केला. त्यानतंर दुसऱ्या संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ते करताना त्याचे चित्रीकरण त्याने केले. या चित्रीकरणाच्या आधारे तिघांपैकी एक जण त्या युवतीला बदनामी कऱण्याची धमकी देऊ लागला. तसेच ते चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देत होता. चित्रीकरण केलेला व्हिडोओ १४ मार्चला संशयिताने त्या युवतीच्या मोबाईलवर पाठविला. त्यामुळे ती युवती भयभीत झाली. तिने आज तिच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात त्या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. ही तक्रार आज अधिक तपासाकरीता वैभववाडी पोलीसांना प्राप्त झाली. या गंभीर प्रकारामुळे पोलीसांनी जलदगतीने तपास सुरू केला.
या गुन्ह्यातील तिन्ही संशयित आरोपींना पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हवालदार रणजित सावंत, किरण मेथे यांनी अटक केली. ही घटनेची माहीती मिळाल्यानतंर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोनी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव हे वैभववाडीत दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळी भेट दिली.तसेच फॉरेन्सीक पथक नेर्ले येथे दाखल झाले. त्यांनीही घटनास्थळाची तपासणी केली. संशयित आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.














