खळबळ, देवगडात प्राथ. आरोग्य केंद्रात महिला डॉक्टरवर हल्ला

पोलिसांचीही गाडी फोडली
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 16, 2026 18:01 PM
views 202  views

देवगड : शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला करून अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच दगडफेक करून पोलिसांच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी संशयित आरोपी राजा धर्मा गोरुड (रा. तुळशीनगर, जामसंडे) याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋचा भुजंगराव भांडवले (वय २७, रा. शिरगाव) यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी रात्री १० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. ऋचा भांडवले या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करत होत्या. त्याचवेळी आरोपी राजा धर्मा गोरुड हा रुग्णालयात आला. कोणतेही कारण नसताना मोठ्याने आरडाओरड करत त्याने रुग्णालय परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, उपचारासाठी दाखल असलेल्या संतोष आरेकर याच्याकडे जाऊन त्याने पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.

रुग्णालयातील शांतता भंग होत असल्याने आणि रुग्णांना त्रास होत असल्याने डॉ. ऋचा भांडवले यांनी आरोपीला शांत राहण्यास सांगत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा राग अनावर झाल्याने आरोपी थेट महिला डॉक्टरच्या अंगावर धावून गेला. त्याने अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत “तुम्हाला बघून घेईन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

घटनास्थळी उपस्थित असलेले साहिल रामटेके हे डॉ. भांडवले यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त झालेल्या आरोपीने डॉ. भांडवले आणि साहिल रामटेके यांच्या दिशेने दगडफेक केली.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र आरोपीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठेवलेली झाडाची कुंडी उचलून थेट पोलिसांच्या वाहनावर फेकली. या हल्ल्यात पोलिसांच्या गाडीच्या काचा फुटल्या. तसेच एक पोलीस देखील जखमी झाल्याचे समजते.तसेच काही लोकप्रतिनिधींवरही आरोपीने दगडफेक व शिवीगाळ केली. यात एका लोकप्रतिनिधीच्या वाहनाची काच फुटली, तर दुसऱ्या लोकप्रतिनिधीवर हल्ला केल्याने त्याच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

महिला वैद्यकीय अधिकारी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करून दहशत माजवल्याप्रकरणी आरोपी राजा धर्मा गोरुड याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.