
सिंधुदुर्ग : एका अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीचा पोलिसांनी न्यायालयात दुसरा जामीन अर्ज देखील सिंधुदुर्ग जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.टी.त्रिपाठी साहेब यांनी फेटाळून लावला आहे. यापूर्वीचा आरोपीचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला होता.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शंकर गणपत जाधव (वय ५० वर्ष, रा. वेतोरे) याने २१ मार्च २०२६ रोजी पीडित चिमुकली एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला आपबिती सांगितली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुडाळ पोलीस ठाण्यात 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली होती.
या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर केले. चार्जशीट दाखल होताच आरोपीच्या वकिलांनी पुन्हा एकदा कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या वेळी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड. रुपेश देसाई यांनी तर मूळ फिर्यादीच्या (पीडितेच्या) बाजूने ॲड. प्रणिता कोटकर-राऊळ यांनी सरकार पक्षाला सहकार्य करत कायदेशीर मुद्द्यांवर आधारित युक्तिवाद केला.न्यायालयाचा
मोठा निर्णय
सरकारी वकील ॲड. रुपेश देसाई आणि पीडितेच्या वतीने ॲड. प्रणिता कोटकर-राऊळ यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले असले तरी गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. आरोपीला या टप्प्यावर जामीन दिल्यास तो पीडित कुटुंबावर दबाव आणू शकतो किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून, मेहरबान न्यायालयाने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे मान्य करत आरोपी शंकर जाधव याचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावला. न्यायालयाच्या या कडक निर्णयामुळे पीडित कुटुंबाला आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून कायद्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.














