LIVE UPDATES

'त्या' दगड खाणीवरील डंपर व मोटारसायकल जप्त

मारहाण करणं आलं अंगाशी
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 11, 2026 19:05 PM
views 521  views

सावंतवाडी : वेत्ये येथील एका दगड खाणीवर उत्खननाचे मोजमाप सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक डंपर आणि एक मोटारसायकल जप्त केली असून आणखी एक डंपर जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

बाबुराव नामदेव तेंडुलकर, सुभाष प्रभाकर राणे आणि प्रभाकर राणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वेत्ये खाणीवर  उत्खनन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नागपूर येथील ईटीएस (ETS) विभागाचे शासकीय अधिकारी मोजमाप करण्यासाठी आले होते. यावेळी तक्रारदार साईप्रसाद कल्याणकर व महेश सावंत तेथे उपस्थित होते. याचा राग धरून खाणमालक व त्यांच्या साथीदारांनी तक्रारदारांना मारहाण केली. तक्रारदाराची कार डंपर आडवे लावून अडवण्यात आली, मोबाईल फोडून टाकण्यात आला आणि महेश सावंत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच यापुढे तक्रार करणार नाही असे बळजबरीने बॉण्ड पेपरवर लिहून घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.