LIVE UPDATES

सिंधुदुर्गात भीषण दुष्काळाचे सावट

मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर तात्काळ बंदी घाला : डॉ. जयेंद्र परुळेकर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 19:36 PM
views 18  views

सावंतवाडी : जिल्ह्यात यंदा पावसाने मारलेल्या ओढीमुळे आगामी काळात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळ निवारणासाठी तात्काळ निधी मंजूर करावा, मनरेगा मार्फत कामे सुरू करावीत तसेच वनराई व कच्चे बंधारे बांधावेत. याशिवाय, भीषण पाणीटंचाई लक्षात घेता मोठे बांधकाम प्रकल्प पुढच्या पावसापर्यंत तात्काळ स्थगित ठेवून ते पाणी पिण्यासाठी राखून ठेवावे, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला ठाकरे शिवसेनेचे विधानसभेचे चंद्रकांत गावडे, नगरसेवक देवेंद्र टेमकर, शहर संघटक निशांत तोरस्कर, उपाध्यक्ष अशोक धुरी आणि जिल्हा उपसंघटक शब्बीर मणियार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. परुळेकर म्हणाले की, जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात पाणीटंचाईचे उग्र रूप पहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले जात असले तरी यात  शासकीय पातळीवर उदासीनता दिसून येत आहे. शासनाने बंधारे बांधण्यासाठी पुरेसा निधी देऊन पाणी अडवण्याचे काम युद्धपातळीवर केले पाहिजे. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांना मोठा पाणीपुरवठा लागत असल्याने, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करण्यासाठी अशा मोठ्या बांधकामांवर पावसाळ्यापर्यंत बंदी घालण्यात यावी.

कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झालेला असताना केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. जिल्ह्यात झालेली बेसुमार वृक्षतोड याला कारणीभूत असून, प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याबाबत आत्मपरीक्षण करून बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

देशातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना डॉ. परुळेकर म्हणाले की, देशभरात बोगस निवडणुका, पेपरफुटीचे प्रकार आणि स्पर्धा परीक्षांमधील घोळ यामुळे विद्यार्थ्यांसह जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. देशात सध्या स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे आंदोलनाचे वातावरण तयार झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर समाजात संशय निर्माण झाला असून, पारदर्शकतेसाठी देशात फेरनिवडणुकीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या जिल्हा दौऱ्यावर त्यांनी टीका केली.