LIVE UPDATES

तब्बल ४ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

श्रीवर्धन पोलिसांची मोठी कारवाई; ३ तस्करांना ठोकल्या बेड्या
Edited by: संदेश घोलप
Published on: October 06, 2026 21:00 PM
views 54  views

श्रीवर्धन : रायगड जिल्हयातील श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध वन्यजीव तस्करीविरोधात अत्यंत दमदार कामगिरी बजावत सुमारे ३ कोटी ९६ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. या धडक कारवाईत एकूण ३.९६० किलोग्राम व्हेल माशाची उलटी (ॲंबरग्रीस सदृश पदार्थ) आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, जिवणा कोळीवाडा येथील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गोपनीय बातमीवरून रचला सापळा

५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:०० वाजता श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका मोटरसायकलवरून (क्र. MH 06 CV 3810) बेकायदेशीरपणे व्हेल माशाची उलटी वाहून नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक (स.पो.नि.) विजयकुमार देशमुख व त्यांच्या पथकाने तत्काळ जिवणा पार नाका, श्रीवर्धन येथे नाकाबंदी करून सदर मोटरसायकल अडवली. मोटारसायकल चालक विराज महेंद्र चौलकर (वय २५, रा. जिवणा कोळीवाडा, ता. श्रीवर्धन) याच्याकडे विचारपूस व झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात ६०४ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आढळून आली.

सखोल चौकशीतून मुख्य साठा उघड

या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६१/२०२६ नुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी विराज चौलकर याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने हा साठा ऋतुराज रामचंद्र रघुवीर (वय १९) व त्याचे वडील रामचंद्र रघुवीर (वय ४६, दोन्ही रा. जिवणा कोळीवाडा) यांच्याकडून मिळवल्याचे कबूल केले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रामचंद्र रघुवीर यांच्या राहत्या घरात छापा टाकून तेथून आणखी ३.३५६ किलोग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी हस्तगत केली.

जप्त मुद्देमाल व कायदेशीर कारवाई

एकूण जप्त ॲंबरग्रीस: ३.९६० किलोग्राम (बाजारभाव रु. ३,९६,००,०००/-)

इतर मुद्देमाल: होंडा कंपनीची मोटारसायकल (किंमत रु. ६०,०००/-)

एकूण जप्त किंमत: रु. ३,९६,६०,०००/- (सुमारे ४ कोटी रुपये)

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विजयकुमार देशमुख करीत आहेत.

मार्गदर्शन व कामगिरी करणारे पथक

ही यशस्वी कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू सोनावणे आणि श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाई करणाऱ्या पथकात सपोनि विजयकुमार देशमुख, पो.ह. अनिल हिवाळे, पो.ना. श्रीकांत सातपुते, पो.शि. कृष्णहरी कदम, दादासाहेब खिलारी, पांडुरंग तणपुरे, तैफिक शेख, विकास काळेल आणि म.पो.शि. कांचन जवान या सर्व श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

रायगड पोलिसांचे जनतेला आवाहन

"वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार व्हेल माशाची उलटी बाळगणे, तिची वाहतूक करणे अथवा खरेदी-विक्री करणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे. समुद्रकिनारी किंवा अन्य कुठेही असा संशयास्पद पदार्थ आढळून आल्यास नागरिकांनी स्वतःजवळ न ठेवता तत्काळ वनविभाग किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा."

— जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड-अलिबाग