दोडामार्ग : साटेली-भेडशी येथील घरफोडी प्रकरणाचा दोडामार्ग पोलिसांनी अल्पावधीत छडा लावत संशयित हर्ष सूर्यकांत नाईक याला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान त्याने घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्याच्या ताब्यातून सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी आशेशाव सालू रॉड्रीक्स यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे भाऊ रोमाल शिलोरियन फर्नांडिस यांच्या साटेली-भेडशी (वरचीवाडी) येथील घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला होता. त्यानंतर घरातील सुमारे ३ लाख ७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी २९ जून रोजी दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलातील श्वान 'सनी' यांच्या मदतीने संशयित हर्ष सूर्यकांत नाईक याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीदरम्यान त्याने घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
या कारवाईमुळे साटेली-भेडशी येथील घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात दोडामार्ग पोलिसांना यश मिळाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मागाडे, पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस हेडकॉन्स्टेबल वसंत देसाई, विठोबा सावंत, विक्रम गवस, बाळकृष्ण गवस, अंकुश नाईक, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, परशुराम सावंत आणि श्री. गावडे यांनी पार पाडली.