LIVE UPDATES

सागर कारिवडेकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2026 22:04 PM
views 226  views

सावंतवाडी : येथील सर्वोदय नगर परिसरात मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  ठाणे येथेही त्याच्यावर गुंतवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल असून तेथील पोलिस तपासासाठी त्याचा ताबा मिळण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.

पुणे येथील काही व्यक्तींनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सागर कारिवडेकर याला मोठी रक्कम दिली होती. परतावा किंवा मुद्दल मिळत नसल्याने संबंधितांनी पैशांच्या मागणीसाठी सावंतवाडी गाठली होती. त्यावेळी सर्वोदय नगर परिसरात त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सागर कारिवडेकर फरार होता. अखेर तो कारिवडे या आपल्या मूळ गावी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गावात सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने अटक केली. पोलीस कोठडीनंतर आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.