LIVE UPDATES

Rajapur Court Bomb Threat : रत्नागिरी, सिंधुदुर्ग पाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी

ई-मेलमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क; न्यायालयाची इमारत रिकामी करून बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 04:48 PM
views 90  views
Police and bomb detection squad conduct a security check at Rajapur Civil Court in Ratnagiri following a bomb threat email.

राजापूर : रत्नागिरी जिल्हा न्यायालयापाठोपाठ राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयालाही ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने राजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या धमकीची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी न्यायालयाची संपूर्ण इमारत रिकामी केली. न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच विविध कामांसाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची घटना ताजी असतानाच राजापूर न्यायालयालाही अशाच स्वरूपाचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तातडीने न्यायालय परिसरात धाव घेत सुरक्षा व्यवस्था ताब्यात घेतली.

न्यायालयातील सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाकडून न्यायालयाच्या इमारतीतील प्रत्येक खोली, विविध विभाग तसेच संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण होते. राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील अन्य काही न्यायालयांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या घटनांकडे सुरक्षा यंत्रणांकडून गांभीर्याने पाहिले जात असून, संबंधित यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोठून पाठविण्यात आला, त्यामागील उद्देश काय आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. न्यायालयाच्या इमारतीतील तपासणीत काही संशयास्पद आढळले आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.