
राजापूर : राजापूर शहरातील एसटी डेपो परिसरात अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यावरून दोन व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत उमटल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. एका अधिकृत बीअर बारमध्ये नियमबाह्य वेळेनंतर दारू विक्री तसेच बनावट दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संबंधित बारवर छापा टाकल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास एसटी डेपो परिसरातील एका बीअर शॉपीमध्ये अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यावरून दोन व्यावसायिकांमध्ये बाचाबाची झाली. या वादानंतर त्यातील एका व्यक्तीने राजापूरातील एका अधिकृत बीअर बारमध्ये निर्धारित वेळेचे नियम डावलून दारू विक्री होत असल्याची तसेच बनावट दारू विक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला दिल्याचे समजते.
या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास संबंधित बारवर धाड टाकली. या कारवाईदरम्यान बार निर्धारित वेळेनंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती मिळत आहे.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी बारची झडती घेतली असता बनावट असल्याचा संशय असलेल्या बीअरच्या बाटल्या तसेच देशी दारूचे बॉक्स आढळून आल्याची चर्चा आहे. मात्र, या कारवाईत नेमका किती मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच संबंधित दारू बनावट असल्याचे अधिकृतपणे निष्पन्न झाले आहे का, याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर संबंधित तक्रारदाराने एका पत्रकाराला घटनास्थळी बोलावून घेतल्याचीही चर्चा शहरात सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या कारवाईमुळे राजापूर शहरातील अवैध दारू व्यवसायाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील जप्त मुद्देमाल, कारवाईचे स्वरूप आणि पुढील कायदेशीर कार्यवाही याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.














