
रत्नागिरी : स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही, चालता येत नाही; मात्र आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने मनात असतात. याच स्वप्नांना पंख देत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तीव्र दिव्यांगांनी यंदा ‘विमान प्रवास’ सहलीचा अविस्मरणीय अनुभव घेतला. मुंबई ते गोवा असा विमान प्रवास करत या दिव्यांगांनी अक्षरशः ‘पायांना मर्यादा असल्या तरी स्वप्नांना नाहीत’ हा संदेश दिला.
दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून प्रत्येकी एका दिव्यांगाची विमान प्रवास सहलीसाठी निवड केली जाते. पोलिओ, पॅराप्लेजिया, मस्कुलर डिस्ट्रॉफी आदी तीव्र दिव्यांगत्व असलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे अथवा चालणे शक्य नसलेल्या दिव्यांगांना या उपक्रमात प्राधान्य दिले जाते. विशेष म्हणजे ही सहल पूर्णतः विनाशुल्क असते.
अनेकदा तीव्र दिव्यांगत्वामुळे घराचा उंबरठाही ओलांडता न आलेल्या या व्यक्तींना या उपक्रमातून थेट गगनभरारी घेण्याची संधी मिळते. यावेळी नऊ दिव्यांगांसोबत त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नऊ व्हीलचेअर्सचीही व्यवस्था करण्यात आली होती.
या सहलीत सूरज सुरेश चव्हाण (राजापूर), देवेश अजित कुळ्ये (लांजा), मंदार रमेश आग्रे (संगमेश्वर), रघुनाथ भगवान गोरे (खेड), द्रोपदी बाल्या चोळले, सूर्यकांत गोविंद चोगले (दापोली), रिया संदीप मोरे (खेड), श्रावणी चंद्रशेखर शिंदे (चिपळूण) आणि सुगंधा अनंत कोदारे (संगमेश्वर) यांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत मदतनीस म्हणून समीर करीम नाकाडे (रत्नागिरी), साक्षी संदीप मोरे (खेड) तसेच सहलीचे आयोजक अशोक विठ्ठल भुस्कुटे उपस्थित होते.
मुंबईकडे मध्यरात्री प्रयाण
सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सर्व दिव्यांग भुस्कुटे यांच्या निवासस्थानी जमा झाले. बापू काणे यांच्या येथील जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर मध्यरात्री टेम्पो ट्रॅव्हलरने सर्वांनी मुंबईकडे प्रयाण केले. मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी भुस्कुटे यांच्या कन्या आलिया हुजेर खान व जावई हुजेर रशीद खान यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी सर्व दिव्यांगांची फ्रेश होण्याची, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. ‘कुणाला मदत करण्यासाठी घर मोठे असण्याची आवश्यकता नसते, तर मन मोठे असावे लागते,’ याची प्रचिती या कुटुंबाच्या आपुलकीतून आली.
आणि अखेर... विमानाने घेतली गगनभरारी!
दुपारी २ वाजता सर्वजण सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरील झगमगाट आणि विमान कंपनीच्या सेवेमुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सायंकाळी ४ वाजता सर्वजण विमानात आसनस्थ झाले.
ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर आला आणि सायंकाळी ४.३० वाजता विमानाने आकाशात झेप घेतली. ज्याला पृथ्वीतलावर स्वतःच्या पायावर उभे राहणे शक्य नाही, त्याला आज आकाशात उडण्याचे पंख लाभले होते. ‘आकांक्षा पुढती, गगन ठेंगणे’ या उक्तीचा प्रत्यय या क्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. विमान प्रवासादरम्यान खिडकीतून दिसणारे आकाश, ढग, खालील भूप्रदेश आणि निसर्गदृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी दिव्यांगांमध्ये उत्साहाची लाट उसळली होती.
सायंकाळी ५.३० वाजता विमान दाबोळी, गोवा येथे पोहोचले. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नऊ दिव्यांगांसाठी नऊ व्हीलचेअर्स विमानातून बाहेर आणून दिल्या. त्यानंतर सर्वांना सुरक्षितपणे विमानतळाबाहेरील टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसवण्यात आले.
गोव्यात झाले जिव्हाळ्याने स्वागत
जुना गोवा रस्त्यावरील कालापूर येथील रुग्णाश्रय आश्रमात भुस्कुटे यांचे मामेभाऊ दिलीप सहकारी यांनी दिव्यांगांच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली होती. संस्थेचे पदाधिकारी व सहकारी दिव्यांगांच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होते.
गोव्याच्या आदरातिथ्याचा आणि दातृत्वाचा अनुभव या सहलीदरम्यान सर्वांना आला. रुग्णाश्रय संस्थेच्या अध्यक्षा चित्रा नाईक यांनी प्रत्येक दिव्यांगाला भेटवस्तू देऊन आपुलकीने विचारपूस केली. संस्थेच्या वतीने दिव्यांगमित्र अशोक भुस्कुटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जनशताब्दीने परतीचा प्रवास
२३ सप्टेंबर रोजी सकाळी रुग्णाश्रय येथे चहा-नाश्ता करून सर्वांनी ट्रॅव्हलरने मडगाव रेल्वे स्थानक गाठले. दुपारच्या जनशताब्दी एक्स्प्रेसने चार दिव्यांग आणि एक सहकारी रत्नागिरी येथे उतरले, तर उर्वरित पाच दिव्यांग व दोन सहकारी चिपळूण येथे उतरले. एकत्र अनुभवलेले हे अविस्मरणीय क्षण मागे ठेवून सर्वांनी साश्रू नयनांनी एकमेकांचा निरोप घेतला.
समीर नाकाडे व साधना गुढेकर यांचे विशेष परिश्रम
ही सहल यशस्वी करण्यासाठी सहलीच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष सहलीदरम्यान दिव्यांगांची उचलपाचल, व्हीलचेअर व्यवस्थापन आणि प्रत्येकाची काळजी घेण्याचे अत्यंत कठीण काम समीर करीम नाकाडे यांनी विशेष परिश्रम घेऊन पार पाडले.
तसेच गोव्यात उतरल्यापासून दिव्यांगांना जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये सुरक्षितपणे बसवून देईपर्यंत भुस्कुटे यांच्या मानसकन्या साधना गुढेकर यांनीही विशेष मेहनत घेतली. ही सहल केवळ विमान प्रवास नव्हती, तर दिव्यांगांच्या मनातील स्वप्नांना पंख देणारा, आत्मविश्वास वाढविणारा आणि ‘मर्यादा शरीराला असतात; स्वप्नांना नाही’ हा संदेश देणारा अविस्मरणीय अनुभव ठरली.










