
कुडाळ : पंतप्रधान यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे २५ सप्टेंबर रोजी 'महिला आरोग्य व स्वच्छता जागरूकता' या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी रुग्ण कल्याण समिती सदस्या रश्मी नाईक, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग, बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय वाळके, डॉ. सुशांता कुलकर्णी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रितम जगताप यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी रश्मी नाईक व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रितम जगताप यांनी महिलांचे आरोग्य, स्वच्छता आणि स्वतःची काळजी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अभियानाअंतर्गत रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सनराईज हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या सहकार्याने जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे 'सर्वांगीण महाआरोग्य तपासणी शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात खालील आजारांवरील तपासणी व शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. अँजिओप्लास्टी, लहान छिद्राद्वारे बायपास शस्त्रक्रिया , दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट व पित्ताशयातील खड्यांचे ऑपरेशन, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, मणक्याचे ऑपरेशन, डायलिसिस रुग्णांसाठी कायमस्वरूपी डायलिसिस, कॅथेटर व ए.व्ही. फिस्टुला यावर उपचार केले जाणार आहेत.
२७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 'सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान' येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.










