कुडाळमध्ये 'कल्याण मटका' जुगारावर पोलिसांचा छापा

एकाला अटक
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 02, 2026 19:03 PM
views 239  views

कोकणसाद LIVE चा इम्पॅक्ट

कुडाळ : कुडाळ एसटी स्टँड परिसरातील हॉटेल ग्रीन व्ह्यू समोरील एका टपरीच्या आडोशाला बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यावर कुडाळ पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ एसटी स्टँड समोर असलेल्या हॉटेल ग्रीन व्ह्यूच्या समोरील एका टपरीच्या आडोशाला एक इसम लोकांकडून पैसे स्वीकारून 'कल्याण मटका' नावाचा जुगार खेळवत असल्याची विश्वासार्ह माहिती पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.

पोलिसी कारवाई आणि जप्त मुद्देमाल

दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता, दिनेश अरविंद नेरुरकर (वय ५५, रा. नेरुर देऊळवाडा, ता. कुडाळ) हा इसम लोकांकडून पैसे घेऊन कागदावर आकडेमोड करताना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

मटका जुगाराची आकडेमोड असलेली कागदपत्रे.

निळ्या शाईचा बॉलपेन आणि कार्बन पेपर.

२,३४५ रुपये रोख रक्कम.

कायदेशीर कारवाई

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल चव्हाण यांनी फिर्याद दिली असून, संशयित आरोपी दिनेश नेरुरकर याच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.