बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर धाड प्रकरण ; आणखी चौघांना अटक

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 29, 2026 20:55 PM
views 109  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निरुखे-सुतारवाडी येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने टाकलेल्या धाड प्रकरणी आज अन्य चौघांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी रात्री धाड टाकली या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६५, रा. निरुखे सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली होती. आज अन्य संशयित चौघाना अटक करण्यात आली. यामध्ये दयानंद सोनू कदम (वय, ३३ असरोंडी ) आग्नेल मार्शल डिसोजा वय (३२ भडगाव), योगेश राजाराम तावडे (वय २८, ओरोस), सिद्धेश चंद्रकांत मराठे (वय २९, कडावल) यांचा समावेश आहे चौघाना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. निरुखे सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध अग्निशस्त्रे तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने २७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निरुखे येथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ३ तयार अग्निशस्त्रे, बंदुकीचे ४ लाकडी बट, ६ लोखंडी बॅरल आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर साहित्य जप्त केले होते  याप्रकरणी संशयित जगन्नाथ मेस्त्री याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी गुरुदास पाडावे करीत आहेत.