LIVE UPDATES

वैभववाडीत राडा | कोल्हापूरच्या तरुणांना चोप

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 18, 2025 23:19 PM
views 682  views

 वैभववाडी : शहरातील बसस्थानकासमोर नगरसेवकाच्या दुचाकीला मोटारची धडक बसल्यामुळे जोरदार राडा झाला.नगरसेवकाच्या समर्थकांनी मोटार चालक आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना चोप दिला.तासभर हा प्रकार बसस्थानकासमोर सुरू असल्याने  वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.हा प्रकार आज (ता.१८) सायकांळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास झाला.

  वैभववाडीत शहरात कॉक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे सध्या नेहमी वाहतुक कोंडी  होत असते.त्यात आज आठवडा बाजार असल्याने वाहनांची मोठी गर्दी बाजारपेठेत होती.दरम्यान कोल्हापुरमधील एका अलिशान मोटारमधुन पाच जण कणकवलीला जात होते.वैभववाडी बसस्थानकासमोर एका नगरसेवकांच्या दुचाकीला या मोटारीची मागून धडक बसली.यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले.त्यामुळे त्या नगरसेवकाने मोटारचालकाकडे विचारणा केली असता त्याने उध्दट बोलण्यास सुरूवात केली.यावरून दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची सुरू झाली.चालकासोबत बाचाबाची सुरू असताना गाडीत बसलेल्या तिघा तरूणांनी त्या नगरसेवकाशी हुज्जत घालायला सुरूवात केली.एकमेकांत सुरू असलेली शाब्दिक बाचाबाची हातघाईवर पोहचली.कार मधील एकाने थेट नगरसेवकाच्या शर्टाला हात घातला.हा प्रकार सुरू असताना नगरसेवकाचा आजुबाजुला मित्रपरिवार अवघ्या काही मिनिटांत तेथे जमा झाला.त्यांनी मोटार अडवुन त्याला जाब विचारताच त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली.रस्त्यांच्या मधोमध गाडी उभी असल्यामुळे आणि शेकडोची गर्दी जमा झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या.पोलीसांनी मोटार वैभववाडी बसस्थानकाच्या आवारात नेली.तेथे दोनही बाजुच्या लोकांमध्ये चर्चा सुरू होती.मोटारमधील तरूणी आमची चुक झाली.आम्ही माफी मागतो अशी विनवणी करीत होती.परंतु कुणीही ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.त्याचवेळी नगरसेवकाचा मोठा मित्र परिवार तेथे आला.चर्चा सुरू असताना संतप्त स्थानिकांनी मोटारमधील चौघांना बाहेर घेत मारहाण करण्यास सुरूवात केली.पोलीसांनी तरूणांना बाजुला करीत मोटारमधील सर्वाना पोलीस स्थानकात नेले.त्यांच्या पाठोपाठ पोलीस स्थानक परिसरात देखील संतप्त स्थानिक तरूण पोहोचले.पोलीस स्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती.

दीड तास पोलीस स्थानकात चर्चा सुरू होती.त्यानतंर पोलीस स्थानकात तालुक्यातील जेष्ठ लोकप्रतिनिधींनी  दाखल झाले.त्यांनी मध्यस्थी करीत त्या नगरसेवकाची समजुत काढली.त्यानतंर या प्रकरणावर पडदा पडला.मात्र या प्रकाराची चर्चा तालुक्यात जोरदार सुरू होती.