LIVE UPDATES

बैलांची वाहतूक करणाऱ्या गाडीवर पोलिसांची कारवाई

Edited by: विनायक गांवस
Published on: February 19, 2026 16:03 PM
views 155  views

सावंतवाडी : सावंतवाडी ते चंदगड अशा विनापरवाना आणि निर्दयीपणे बैलांची वाहतूक करणाऱ्या गाडीवर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत १८ हजार रुपये किमतीचे दोन बैल आणि ५ लाख रुपयांची गाडी, असा एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास चंदगड रोडवरील चौकुळ, चिखलव्हाळ, बेरडकी परिसरात ही कारवाई करण्यात आली.  वाहनातून दोन बैलांना अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयपणे, कोणतेही वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र किंवा वाहतूक परवाना नसताना नेले जात होते.या प्रकरणी पोलिसांनी बाबू लुमा नाईक (वय २९, रा. चौकुळ, चिखलव्हाळ, बेरडकी, ता. सावंतवाडी) अभिजीत धोंडीबा गावडे (वय २५, रा. चंदगड, इनाम कोविंद्रे, जि. कोल्हापूर) युसुफ इस्माईल खेडेकर (वय ४०, रा. चंदगड - वाहन मालक) यांच्यावर कारवाई केली आहे. वाहन मालकाने आपले वाहन या बेकायदेशीर कामासाठी वापरण्यास दिले, म्हणून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.