
- एकाविरुद्ध गुन्हा
वैभववाडी : खांबाळे येथील भुतलवाडीत सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर वैभववाडी पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत ४ हजार ४१० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या ६३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दर्शन चंद्रकांत पवार (वय ३६, रा. खांबाळे-भुतलवाडी) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांबाळे भुतलवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शैलेंद्र कांबळे, पोलीस कर्मचारी हरेष जायभाय, लक्ष्मण हाके, मोहन राणे तसेच महिला पोलीस पूजा निकम यांनी परिसरात पाळत ठेवली होती. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका घराजवळ संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी तेथे धाड टाकली. तपासणीदरम्यान दर्शन पवार हा गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून ६३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ४ हजार ४१० रुपये इतकी आहे. पोलिसांनी मुद्देमालासह दर्शन पवार याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. गावात ही दारू पुरवठा करणारा पुरवठा दाराही पोलीसांनी शोधून काढावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.













