LIVE UPDATES

त्‍या खूनप्रकरणी संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 19:51 PM
views 37  views

कणकवली : ५ वर्षांपूर्वी तरुणाचा खून करून त्‍याचा मृतदेह फोंडाघाटात दरीत फेकून अपघात असल्‍याचे भासवणार्‍या चार संशयितांना घाटकोपर क्राईम ब्रॅंचने‌ गजाआड करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस कोठडीत रवानगी झालेल्या त्या चारही संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांच्याही पोलीस कोठडीत ३ दिवसांची वाढ केली. 

अशपाक उर्फ निहाल राजशवल्‍ली मुलाणी (२५, सोलापूर) याच्‍या खूनप्रकरणी मनोज नारायण भंडगे (४३, नवी मुंबई), सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर (४०, खलापूर – रायगड), अतिष भगवान मोरे (३९, ठाणे), ऋतूराज रविंद्र शेट्‍टी (३१, ठाणे) असे चार सध्‍या अटकेत आहेत.

अशपाक याचा मृतदेह २८ डिसेंबर २०२१ या दिवशी फोंडा घाटातील दरीत आढळला होता. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वीच हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचे घाटकोपर क्राईम ब्रँचच्या पथकाने 'डिटेक्ट' केले. याच पथकाने चार आरोपींना पकडून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चौघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 

या घटनेचा तपास आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करीत आहेत. पवार यांनी दिलेली माहिती अशी, अशपाक व वरील संशयित यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. अशपाक व संशयित मिळून एक कंपनी चालवत होती. या कंपनीच्या मार्फत अशपाक याने परस्पर व्यवहार केले होते. सदर प्रकार घडला त्यावेळी संशयित व अशपाक सिंधुदुर्गातील कुडाळ येथील हॉटेल ओमकार डीलक्स येथे वास्तव्याला होते. तेथून अशपाक गावी निघून गेला होता. मात्र संशयितांनी बोलावल्यामुळे तो पुन्हा आला. तर ५ डिसेंबरच्या रात्री संशयितांनी फायबरच्या काठीने अशपाक याला बेदम मारहाण केली होती. यामध्ये अशपाक याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संशयितांनी इनोवा कारद्वारे अशपाक याचा मृतदेह व त्याच्या ताब्यातील दुचाकी दरीत टाकली. त्यानंतर संशयित हॉटेल ओंकार डिलक्स येथे परतले. तेथून आपापले साहित्य घेऊन संशयित येथून गुपचूप पसार झाले होते, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

दरम्यान संशयतांना न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी पोलिसांनी या खुणा मध्ये आणखी दोघांचा सहभाग असून त्यांना अटक करणे सहा संशयीतान व्यतिरिक्त खुणामध्ये आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्याचा शोध घेणे खून करण्यासाठी वापरलेली काठी तसेच वाहन जप्त करणे अधिकाऱ्यांसाठी संशयीतांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी कणकवली न्यायालयाकडे केली त्यानुसार न्यायालयाने कोठडीत वाढ केल्याची माहिती देखील श्री पवार यांनी दिली