दोडामार्ग सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांची कारवाई

गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक करणारा ताब्यात
Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2026 13:59 PM
views 154  views

दोडामार्ग : दोडामार्ग येथील सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांनी कारवाई करत गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाला गजाआड केले. प्रसाद शंकर गुणाजी (३० वर्षे, रा. लक्ष्मी गल्ली, हलगा व्ही.टी.सी., ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून सुमारे २ लाख ५१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद शंकर गुणाजी हा त्याच्या ताब्यातील अल्टो कार घेऊन सोमवारी रात्री ९ वा.च्या सुमारास गोवा राज्यातून दोडामार्गला येत होता. यावेळी राज्याच्या सीमा तपासणी नाक्यावर पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, स.पो.नि. नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक आशिष भगत, हवालदार रामचंद्र मळगावकर, श्री. देसाई गस्त घालत होते. दरम्यान प्रसाद याची कार तेथे आली असता ती तपासणीसाठी थांबवली. यावेळी त्याच्या कारमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान पोलिसांनी डीएसपी ब्लॅक डीलक्स व्हिस्की  या ब्रँडच्या १८० मि.ली. मापाच्या एकूण १६८ काचेच्या बाटल्या जप्त केल्या. या दारूची अंदाजे किंमत २६ हजार ८८० रुपये इतकी असून, २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या कारसह एकूण २ लाख ५१ हजार ८८०  रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. संशयित प्रसाद गुणाजी विरुद्व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.