
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. सौरभ महादेव वाघे (४०, रा. कळवंडे, ता. चिपळूण) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर विपुल रामअवतार सिंग (२७, रा. आजमगड, उत्तरप्रदेश) असे जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
कंटेनर चालक विपुल सिंग हा आपल्या ताब्यातील कंटेनरमधून ड्रम लोटे ते गोव्याच्या दिशेने घेऊन चालला होता. तर दुचाकीस्वार सौरभ वाघे हा आपल्या दुचाकीने चिपळूण ते लोटेच्या दिशेने चालला होता. यावेळी कंटेनर परशुराम घाटात आला असता कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने महामार्गावरील दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेला आणि चिपळूणच्या दिशेकडून लोटेकडे दुचाकीस्वार सौरभ वाघे यांना जोरदार धडक देत फरफटत ३० फूट दरीत नेले आणि कंटेनरदेखील या दरीत कोसळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर कंटेनर कलंडल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ रामपूरकर, पोलीस हवालदार बळीराम शिंदे, तुषार राठोड, आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमी कंटेनर चालकाला परशुराम दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. तर मृत दुचाकीस्वार सौरभ वाघे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, या घटनेची माहिती कळवंडे गावात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली.
सौरभचा जागीच मृत्यू
सौरभ हा लोटे येथील एका कंपनीत कामाला होता. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी तो कंपनीत कामावर जाण्यासाठी दुचाकीवर निघाला होता. कंपनीत पोहोचण्यासाठी काही कालावधी असतांनाच सौरभवर काळाने झडप घातली. कंटेनर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला कंटेनर आल्याने दुचाकीस्वार सौरभ वाघे याला जोरदार धडक दिल्याने सौरभचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची बातमी कळवंडे गावात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली. तर सौरभच्या वडिलांचा कळवंडे- करंबवणे फाट्यावर हॉटेल व्यवसाय असल्याने येथील अन्य व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद करून सौरभला श्रद्धांजली अर्पण केली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








