LIVE UPDATES

Sindhudurg Fort : किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६२ वा वर्धापन दिन साजरा

अतुल काळसेकर यांच्या हस्ते मोरयाच्या धोंड्यावर शासकीय पूजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 05:05 PM
views 25  views
Government puja and 362nd foundation anniversary celebration of Sindhudurg Fort at Morayacha Dhonda in Malvan.

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक दूरदृष्टीची साक्ष देणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा 362 वा वर्धापन दिन मालवण येथील श्री मोरयाचा धोंडा येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने धार्मिक विधी, शासकीय पूजन आणि शिवरायांच्या इतिहासाचे स्मरण करून ऐतिहासिक सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा पाषाणाचे ऐतिहासिक, पारंपरिक, भौगोलिक आणि आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते शासकीय पूजन करण्यात आले. 

यावेळी श्री क्षेत्र मोरयाच्या परिसराच्या विकासासाठी, शिवप्रेमींच्या ऐतिहासिक आस्थेचा ठेवा स्मारक स्वरूपात जतन होण्यासाठी तसेच सर्वांच्या सुख, शांती, समाधान आणि समृद्धीसाठी विशेष गाऱ्हाणे घालण्यात आले.

शासकीय पूजनामध्ये तहसीलदार गणेश लव्हे आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार सहभागी झाले होते. किल्ले प्रेरणोत्सव समितीचे सदस्य आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देत हा सोहळा पार पडला.

शिवकालीन पुरोहित अभ्यंकर कुटुंबीयांचे वंशज रविकिरण आपटे यांनी 362 व्या शासकीय पूजेचे पौरोहित्य केले. शिवप्रेमी भाऊ सामंत यांनी उपस्थितांसह छत्रपती शिवरायांच्या स्तुतिपर रचना आणि प्रार्थनेचे पठण केले. पूजेनंतर सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले.

अतुल काळसेकर यांनी श्री मोरयाचा धोंडा परिसराच्या स्मारक स्वरूपातील विकासासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर जोरदार पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या अपेक्षेनुसार या परिसराचा विकास करून ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच या परिसराचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून महत्त्व प्राप्त झालेल्या मोरयाच्या धोंड्यावरील धार्मिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक प्रतीकांची महती जतन होणे आवश्यक आहे. हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि सर्वांना त्याचे महत्त्व समजावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.