LIVE UPDATES

Dodamarg Illegal Tree Cutting : तळेखोलमध्ये अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई

आंबा, फणस यांसह अन्य झाडांचा लाकुडसाठा जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 24, 2026 07:22 PM
views 32  views
Forest Department seizes timber after illegal tree cutting at Talekhol Gadganjawadi in Dodamarg

दोडामार्ग : तळेखोल-गडगंजवाडी येथे खासगी जागेत केलेल्या अवैध वृक्षतोडीवर वन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सर्व लाकूडसाठा जप्त करून वनविभाग कार्यालयात आणला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांनी दिली.

तळेखोल गावातील गडगंजवाडी परिसरात लोकवस्तीच्या नजीक असलेल्या खासगी जागेत वृक्षतोड करण्यात आली होती. तोडलेली झाडे कापून त्यांचे लाकूड वाहतुकीसाठी तयार ठेवण्यात आले होते. दोन ते तीन वाहनांमध्ये मोठ्या लाकडाचे तुकडे, तर अन्य दोन वाहनांमध्ये जळाऊ लाकूड भरण्यात आले होते. वनविभागाची अधिकृत परवानगी न घेता ही वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार वनविभागाला करण्यात आली.

वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने तळेखोल येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी तोडलेल्या झाडांच्या लाकडाचा पंचनामा करण्यात आला. तसेच वाहनांमध्ये भरून ठेवलेले सागवान, आंबा, फणस यांसह अन्य झाडांचे लाकूड वनविभागाने जप्त केले. जप्त करण्यात आलेले सर्व लाकूड वनविभागाच्या येथील कार्यालयात आणून ठेवण्यात आले आहे. लाखो रुपये किमतीच्या मौल्यवान झाडांची अशा प्रकारे कत्तल झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.