LIVE UPDATES

Pune Court Firing Incident : पुणे जिल्हा न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला; एक व्यक्ती गंभीर जखमी, दोन बंदुका जप्त

पुणे शहर गुन्हे शाखेने आरोपींची ओळख पटवली असून गुन्हे शाखा स्थानिक पोलीस ठाण्यासोबत मिळून या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 03:42 PM
views 100  views
Police investigation following firing and machete attack outside Pune District Court in Shivajinagar.

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर गेट नंबर 4 परिसरात गोळीबाराची घटना घडली असून आरोपीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत व्हिडिओतून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसराबाहेर मंदार किवळे नावाच्या व्यक्तीवर ४-५ हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात गोळीबार करण्यात आला तसेच कोयत्याने वारही करण्यात आले. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या शरीरावर कोयत्याने वार केल्याच्या जखमाही आहेत.

उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, सध्या तरी गोळी लागल्याच्या खुणा दिसून आलेल्या नाहीत. संशयितांची ओळख पटली असून, घटनास्थळावरून दोन बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगाने तपास करत आहेत. २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज येथील संतोषनगर परिसरात झालेल्या शुभम सुभाष चव्हाण खून प्रकरणातील आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर हा हल्ला करण्यात आला. चार दिवसांपूर्वीच मंदार किवळे कारागरातून बाहेर आला होता आणि आज न्यायालयीन कामकाजासाठी आला असताना त्याच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे.

पुणे शहर गुन्हे शाखेने आरोपींची ओळख पटवली असून गुन्हे शाखा स्थानिक पोलीस ठाण्यासोबत मिळून या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. चार ते पाच संशयित यात सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून यात नेमकी किती माणसे सहभागी होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.