पोक्सोअंतर्गत गुन्ह्यात आरोपीची अटकेतून सुटका

ॲड. विनय मांडकुलकर यांचा युक्तिवाद
Edited by:
Published on: February 16, 2026 09:44 AM
views 56  views

सिंधुदुर्ग : अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणात (पोक्सो) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओरोस येथील मे. न्यायालयाने तात्काळ अटकेतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. बचाव पक्षाचे वकील ॲड. विनय मांडकुलकर यांनी मांडलेला कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत हा निर्णय दिला. या प्रकरणात दीपक विनायक सावंत (वय १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी संबंधित तक्रार) याच्याविरोधात दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी इंस्टाग्रामवर मेसेज पाठवून पाठलाग केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीवरून कुडाळ पोलीस यांनी दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री १०:४५ वाजता आरोपीला अटक केली.तपासादरम्यान आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून अधिक चौकशीसाठी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती.

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲड. विनय मांडकुलकर यांनी न्यायालयासमोर प्रभावी कायदेशीर मुद्दे मांडले. त्यांनी नमूद केले की, संबंधित कलमानुसार कमाल शिक्षा ५ वर्षांपर्यंत आहे. सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या गुन्ह्यांमध्ये ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे अशा प्रकरणांत केवळ आरोपांच्या गंभीरतेवरून आरोपीला दीर्घकाळ कोठडीत ठेवणे आवश्यक नाही. आरोपी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून विनाकारण अटक टाळली जावी, असा मुद्दा त्यांनी मांडला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे, ॲड. वृषांग जाधव आणि ॲड. सुयश गवंडे यांनीही काम पाहिले. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.