LIVE UPDATES

मोटारसायकल चोरटा एलसीबीच्या जाळ्यात

ओल्ड गोव्यातून घेतले ताब्यात
Edited by: दिपेश परब
Published on: June 04, 2026 18:06 PM
views 101  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखा सिंधुदुर्गच्या जाळ्यात हा मोटारसायकल चोरटा सापडला आहे. ओल्ड गोवा येथून एलसीबीच्या पथकाने त्यांला ताब्यात घेत त्याला पुढील तपासासाठी वेंगुर्ला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 

सिद्धार्थ संदेश गावडे (वय १९) राहणार व्हिजन हॉस्पिटल जवळ, म्हापसा -गोवा असे या चोरट्याने नाव आहे. वेंगुर्ला पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनिय माहितीच्या आधारे सिद्धार्थ गावडे याला ओल्ड गोवा  पोलिस ठाण्याच्या हद्दीमधून, कोकोचीन हॉटेल परिसरातून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने वरीलप्रमाणे दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले आहेत. 

दरम्यान या आरोपीविरुद्ध गोवा राज्य तसेच बांदा पोलिस ठाणे, कुडाळ पोलिस ठाणे येथे यापूर्वी देखील घरफोडी, मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपासासाठी त्याला वेंगुर्ला पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार जँक्शन घोन्सालवीस, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिस्कर यांच्या पथकाने केली आहे.